आशययुक्त अध्यापन

4

भाग – १

आशययुक्त अध्यापन पध्दती ही शैक्षणिक क्षेत्रातील नवीन संकल्पना आहे. पाठयपुस्तकातील पाठांतून केवळ माहिती न देता त्या पाठातील आशय हा मूल्यसंस्कारासाठी कसा उपयोगी पडेल? तसेच हा आशय विद्यार्थ्यांना शिकविण्यामागचा नेमका हेतू काय आहे? दहा गाभाभूम घटक व नैतिक मुल्यांशी हा आशय कसा संबंधित आहे याचा सखोल व जाणीवपूर्वक विचार करणे व ही मूल्ये आणि गाभाघटक विद्यार्थ्यांमध्ये रूजविणे म्हणजेच आशययुक्त अध्यापन होय.

आशय व पध्दती हयांचे अर्थपूर्ण एकात्मीकरण म्हणजे आशययुक्त अध्यापन होय. आशय म्हणजे लेखनाचा प्राण; विद्यार्थ्यांना शिकवावयाचा पाठयपुस्तकातील पाठात छापलेला मजकूर होय. आज विषयानुसार काही अध्यापन पध्दती निश्चित झालेल्या आहेत. उदा. स्पष्टीकरण, प्रश्नोत्तर, उद्गामी-अवगामी, व्याख्यान, चर्चा, कथन, नाटयीकरण, प्रयोग-प्रात्यक्षिक दिग्दर्शन, प्रवास वर्णन इ. हया सर्वांचा वापर अध्यापनात होताना दिसतो.

आशययुक्त अध्यापनानुसार पाठाचे नियोजन करतांना (भाषा विषयाच्या) शिक्षकांनी लक्षात ठेवावयाच्या गोष्टी

 1. इयत्ता
 1. गाभाघटक
 1. विषय
 1. अध्यापन सूत्रे
 1. घटक
 1. अध्यापन पध्दती
 1. उपघटक
 1. अध्ययन अनुभव
 1. लेखक/लेखिकेचे नाव
 1. अध्यापन शैक्षणिक साहित्य
 1. निवडलेल्या पाठाचा साहित्यप्रकार
 1. नवीन शब्द, वाक्प्रचार (म्हणी, सुभाषिते इ.)
 1. उपसाहित्यप्रकार
 1. संबोध
 1. संदर्भ साहित्य
 1. व्याकरण
 1. संरचना
 1. शालेय व सहशालेय उपक्रम
 1. संरचनेचे विकसन
 1. फलक-लेखन
 1. पाठाचा आशय
 1. विचारावयाचे प्रश्न ¼ उच्च/निम्नस्तर½
 1. पाठातील महत्त्वाचे मुद्दे
 1. मूल्यमापन : तंत्रे व साधने
 1. पाठाची उद्दिष्टे/क्षमता
 1. स्वाध्याय
 1. मूल्ये/संस्कार
 1. कालावधी

भाग - २

भाषा व साहित्य

भाषा : दोन माणसांना एकत्र आणणारा, विचारांची देवाण-घेवाण करणारा महत्वाचा दुवा म्हणजे भाषा होय.  भाषा ही अभिव्यक्तीचे एक महत्वाचे साधन आहे आणि भाषेचे स्वरुप हे ध्वनिमय आहे.  हे ध्वनी मौखीक वा लिखित स्वरुपात असतात.  ह्या ध्वनींना अर्थ असेल तरच अभिव्यक्ती योग्य होते.

 भाषेची वैशिष्टये :

 1. अनुकरणशीलता
 2. भाषेची समाज सापेक्षता
 3. भाषेची परिवर्तनशीलता
 4. दोन भाषांमधील रचनाभेद

 भाषेची रुपे :

 1. व्यक्तिगत भाषा
 2. समाजभाषा
 3. बोली भाषा
 4. प्रमाण भाषा
 5. राष्ट्रभाषा
 6. मातृभाषा

 भाषेचे महत्व :

 1. विचार प्रकट करण्याचे सोपे साधन
 2. व्यक्तिमत्व विकासात मदत
 3. सांस्कृतिक रक्षणाचे, संवर्धनाचे व संक्रमणाचे साधन
 4. नागरिकतेच्या ऐक्याचा धागा
 5. शिक्षणाचे अत्यावश्यक माध्यम

 भाषा आणि साहित्य (वाङ्‌मय)

भाषा विविध मार्गानी आपल्यापर्यंत पोहचत असते.  मूल जन्माला आल्यापासून भाषिक प्रक्रियेला सुरुवात होत असते.  माणसा-माणसातील आंतरक्रिया, माणूस आणि सभोवतालचा परिसर, माणूस आणि प्रसार माध्यमे या सर्वांमधून भाषेची प्रक्रिया सुरु असते व निरीक्षण, अनुकरण, प्रत्यक्ष वापर ह्यामधून भाषा विकसित होते.

या भाषेतूनच मानवाच्या गरजा भागू लागल्या पण मानव एवढयावरच थांबला नाही तर त्याने बाह्य विश्वाचाही शोध घेतला व त्यातून निर्माण होणाऱ्या भावनाना, विचारांना व्यक्त करण्यासाठी त्याने भाषेची अनेक रुपे वापरली व त्यातून वाङ्‌मय निर्माण झाले व या वाङ्‌मयांना जेव्हा लिखित स्वरुप मिळाले तेव्हा ते साहित्य बनले.

मराठी भाषेचे पाठयपुस्तक आणि साहित्य

पाठयक्रमातील उद्दिष्टे साध्य करण्यासाठी व त्यानुसार योग्य असे शैक्षणिक अनुभव देवून विद्यार्थ्यांचा विकास साधण्यासाठी ”पाठयपुस्तक” हे एक साधन म्हणून वापरले जात आहे. सर्वसाधारणपणे पाठयपुस्तकातून साहित्यप्रकारांच्या आधारे व इतर कौशल्ये व क्षमतांच्या आधारे मातृभाषा (मराठी) शिक्षणाची पुढील उद्दिष्टे साध्य करण्यावर भर देण्यात आलेला आहे.

 1.  लक्षपूर्वक श्रवण करणे व जे श्रवण केले, त्याचे योग्य आकलन होणे.
 2. आपले विचार, भावना, कल्पना व इच्छा स्पष्ट व समर्पक शब्दातून वाचेने व्यक्त करणे.
 3. योग्य उच्चार, योग्य स्वराघात, आशयानुरुप आवाजातील चढ-उतार, योग्य गती यांची जाण ठेवून बोलता येणे.
 4. योग्य उच्चार, योग्य स्वराघात आणि योग्य अभिव्यक्तींचा मेळ साधून अस्खलितपणे प्रकट वाचन करता येणे.
 5. योग्य रितीने मूक-वाचन करता येणे व जे वाचले आहे त्याचे नीट आकलन होणे.
 6. सुवाच्च व वळणदार अक्षरात लिहिता येणे.
 7. आपले विचार, अनुभव, भावना, कल्पना इ. परिणामकारक रितीने व्यक्त करण्यासाठी आवश्यक ते लेखन कौशल्य प्राप्त होणे.
 8. विरामचिन्हांचा वापर करुन व लेखनाच्या नियमानुसार नीटनेटके लेखन करता येणे.
 9. भाषेची जडणघडण समजणे.
 10. विविध साहित्यप्रकारांचा आस्वाद घेण्याची क्षमता निर्माण होणे.
 11. रंगभूमी, चित्रपट, आकाशवाणी, दूरदर्शन, नियतकालिके तसेच इतर आधुनिक प्रसार माध्यमांद्वारे भाषिक क्षमता समृध्द होणे.
 12. अन्य भाषा आणि भाषिकांविषयी आत्मीयता निर्माण होणे.
 13. बोलीभाषेबद्दल आपुलकीची भावना निर्माण होणे.
 14. देशप्रेम, राष्ट्रीय एकात्मता, सर्वधर्मस्नेहभाव, विज्ञाननिष्ठा, सामाजिक बांधिलकी, नैतिक मूल्ये, गाभाघटक, निसर्गप्रेम, शुचिता, न्याय, समता, बंधुता, निर्भयता, स्वावलंबन, श्रम-प्रतिष्ठा इत्यादि गुणांची जोपासना होणे.

वरील सर्व उद्दिष्टे टप्याटप्याने पूर्ण करण्यावर भर प्रत्येक इयत्तेच्या पाठयपुस्तकातून दिलेला आहे.  ही उद्दिष्टे पाठयपुस्तकातून सफल करतांना पाठयपुस्तकातील आशयाचे (1) आशयानुसारी  (2) अभिव्यक्तीनुसारी वर्गीकरण कलेले आहे व हे वर्गीकरण दोन रुपांमध्ये प्रकट झालेले आहे जी रुपे म्हणजे 1) गद्य व 2) पद्य.

भाग -३

विविध साहित्यप्रकार

 गद्य साहित्यप्रकार

 • प्राचीन : वेद, पुराणे, उपनिषदे, ऋचा
 • अर्वाचीन : कथा, नाटक, चरित्र, आत्मचरित्र, बखर, आत्मवृत्त, निबंध, कादंबरी, पत्रे, व्यक्तिचित्रे, वैचारिक लेख, समीक्षा, प्रवासवर्णन, शब्दचित्र.

 पद्य साहित्यप्रकार

 • परवृत्तीय – अभंग, गौळण, विरहिणी, श्लोक, उक्ती, ओवी.
 • आत्मवृत्तीय - महाकाव्य, खंडकाव्य, लोकगीत, नाटयगीत, संगीतिका, सुनीत, नवकाव्य, रुपांतरित काव्य, गझल, हायकू, विडंबन, विलापिका, जानपदगीत, उद्देशिका, भावगीत इतर गीते (स्त्रीगीते, बालगीते), पोवाडा, लावणी, शाहिरी काव्य, स्फुर्ती गीते, देशभक्तीपर गीते, समरगीते, प्रार्थना गीते.

 साहित्यप्रकार व त्यांचे उपप्रकार

 गद्यविभाग

 • कथा – गोष्ट, लघुकथा, रुपककथा, ग्रामिण कथा, दलित कथा, विनोदी कथा, ऐतिहासकि कथा, धार्मिक कथा, पौराणिक कथा, नवकथा, बोधकथा, लोककथा, कहाणी.
 • नाटक – एकांकिका, नाटयछटा, नाटुकले, दीर्घांक, पथनाटय, नाटयउतारा
 • कादंबरी – ऐतिहासिक, राजकिय, पौराणिक, सामाजिक, ग्रामीण, प्रादेशिक, अद्भूतरम्य, वास्तवदर्शी.
 • आत्मचरित्र व्यक्तिचित्र – व्यक्ती, वस्तू, स्थळ, पदार्थ, दैनंदिनी, मनोगत
 • निबंध लेख समीक्षा – वर्णनात्मक, लघुनिबंध, वैचारिक, कल्पनारम्य, आत्मवृत्तात्मक, गुजगोष्ट, ललित निबंध, विविध लेख, स्फुटलेख, अग्रलेख, विचाररप्रधान, माहितीपर, प्रासंगिक
 • पत्रलेखन – औपचारिक, अनौपचारिक, अर्ज, विनंत्या, तक्रार

 पद्यविभाग

 • महाकाव्य – पौराणिक, अभिजात कलात्मक, निबध्द काव्य, कलायुक्त
 • खंडकाव्य – आख्यान कविता, ऐतिहासिक, पौराणिक, कथाकाव्य?
 • नाटयगीत – संगीतिका
 • भावगीत – गीतकाव्य, व्यक्ती, निसर्ग, नवरस
 • जानपदगीत – ग्रामीण, विविध सण-उत्सव-समारंभाशी संबंधित जीवनचित्रण
 • उद्देशिका – स्तूतीगीत, स्तोत्रे
 • बालगीते – हावभावगीत, कृतियुक्तगीत, अभिनयगीत, शिशुगीत
 • विलापिका – शोकगीत

विविध साहित्यप्रकारांचा अध्यापनदृष्टया विचार व अध्यापन पध्दती.

गद्यविभाग

 1. कथा :
  1.1 कथेत आलेल्या व्यक्तिरेखा (पात्रे), स्वभावविशेष
  1.2. कथानक
  1.3. कथेत येणारे प्रसंग, घटना, अनुभव
  1.4. प्रसंगाची घटनांची मांडणी व कथेची वैशिष्टये
  1.5. साद-प्रतिसाद, क्रिया-प्रतिक्रियात्मक संवाद
  1.6. कथेतून होणारे संस्कारअध्यापन पद्दती : कथन, स्पष्टीकरण, प्रश्नोत्तर, चर्चा
 2. नाटक :  
  2.1. नाटकाची संहिता, मध्यवर्ती कल्पना
  2.2. व्यक्तिरेखा, स्वभावविशेष
  2.3. घटना, प्रसंगांची मांडणी
  2.4. नाटयात्मकता, शैली, परिणामकारकता
  2.5. संवाद
  2.6. संस्कारअध्यापन पद्दती : नाट्यीकरण, कथन, भूमिकाभिनय
 3. आत्मचरित्र :
  3.1. लेखकाच्या जीवनातील आंतरक्रिया, नातेसंबंध
  3.2. महत्वपूर्ण घटना, प्रसंग, अनुभव, आठवणी
  3.3. व्यक्ती तितक्या प्रकृतीचा प्रत्यय
  3.4. लेखकाची जीवनदृष्टी, आत्मनिवेदन
  3.5. संस्कारअध्यापन पद्दती – कथन, भूमिकापालन, स्पष्टीकरण, चर्चा
 4. चरित्र :
  4.1. आदर्शवत जीवनाचा परिचय, कार्याचा मोठेपणा
  4.2. विविध घटना-प्रसंगानूसार चरित्रनायकाचे वर्तन
  4.3. संस्कार, आदर्श जीवन जगण्यासाठी परिपाठ
  4.4. चरित्रनायकाची स्वभाववैशिष्टयेअध्यापन पध्दती – चर्चा, स्पष्टिकरण, प्रश्नोत्तर, कथन
 5. निबंध व लेख :
  5.1. वर्ण्यविषयाची सुसंगत मांडणी
  5.2. विषयानुसार मुद्दे-उपमुद्दे, तर्कसंगत विचार
  5.3. कल्पना रम्यता, अनूभवसौंदर्य, वाक्यरचना, दाखले, दृष्टांत, उदाहरणे, अनूभवांची सांगड, भाषाअध्यापन पध्दती : चर्चा, स्पष्टीकरण, प्रश्नोत्तर, कथन
 6. कादंबरी :
  6.1. जीवनाचे कलात्मक व विस्तृत गद्यचित्र
  6.2. कथानक, पात्रचित्रण, घटना व प्रसंगांची गुंफण
  6.3. भाषा, वातावरण, वैचारिकता, शैली
  6.4. विविध प्रकारानुसार मांडणीअध्यापन पध्दती : स्पष्टीकरण, कथन, चर्चा, प्रश्नोत्तर

पद्यविभाग

कोणत्याही प्रकारच्या काव्यातून आनंद मिळविणे हा प्रधान हेतू होय.

आनंद मिळविताना व इतरांना देताना पुढील गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात.

 1. कवितेतील लयबध्दता, नादमयता, ध्वनियुक्त, रचना
 2. विषय व आशयाचा जीवनाशी संबंध
 3. कवी वा कवयित्रींचा जीवनविषयक दृष्टिकोन, अनुभव
 4. कविता रचनेतील विविधता, सौदर्य, शैली, शुध्दता
 5. कवितेची पार्श्वभूमी, भाव-भावना, कल्पना, विचारांचे सौंदर्य, गेयता, अलंकारांचा उपयोग
 6. कवितेचा कालखंड, भाषा, सलगता

अध्यापन पध्दती

 • विविध गीते – साभीनय चालींवर म्हणणे
 • संतकाव्य – कथन, स्पष्टिकरण चाल
 • भावकाव्य – स्पष्टिकरण, प्रश्नोत्तर, चाल
 • अन्य कविता – स्पष्टिकरण, प्रश्नोत्तर, कथन, चाल

भाग – ४

आशययुक्त अध्यापन पध्दतिनूसार नमूनादाखल पाठ टाचण

प्रथम भाषा – मराठी
विषय : मराठी (पद्य)
घटक : वर्णनपर कविता
उपघटक : वासरू
इयत्ता : 4 थी
कालावधी – 35 मिनिटे
कवी : आत्माराम रावजी देशपांडे (अनिल)

मुक्तछंदात्मक कविता मराठी लिहिण्यास प्रारंभ करणारे कवी

सामाजिक उद्बोधन, प्रेमजीवनाची उदात्तता, व्यापक मानवतावाद, दुर्दम्य आशावाद हे त्यांच्या कवितेचे विशेष. ‘फुलवत’, ‘पेर्ते व्हा’, ‘सांगाती’ इ. काव्यसंग्रह. ‘निर्वासित चिनी मुलास’, ‘भग्नमूर्ती’, ही खंडकाव्ये तसेच स्फूट समीक्षालेखन प्रसिध्द.

साहित्यप्रकार : पद्य/कविता

ढोबळमानाने काव्य म्हणजे एखादा अनुभव अतिशय तरलतेने, उत्कटतेने घेऊन त्याची केलेली लगबध्द मांडणी. कोणत्याही काव्याचा प्रधान हेतू हा आनंद मिळविणे होय.

”वासरू” ही वर्णनपर कविता असून यातील कडव्यांमधून कळप सोडलेल्या ओढाळ वासराचे वर्णन केलेले आहे. तहानभूक विसरून वाटेल त्या वाटेने फेर धरून रानोमाळ फिरणाऱ्या वासराची सायंकाळच्या वेळी झालेली तगमग, धराची व वात्सल्याची ओढ हयाविषयी भावपूर्ण वर्णन या कवितेते आलेले आहे. हया कवितेतून जीवनविषयक संदेश चित्रित केलेला आहे.

पूर्वज्ञान : रस्ता हरवलेल्या मुलांविषयी व त्याच्या एकंदरित स्थितीविषयी विद्यार्थ्यांना माहिती आहे.

अध्यापनाचे महत्त्वाचे मुद्दे :

 1. कळप सोडलेले ओढाळ वासरू
 2. फेर धरून रानोमाळ फिरणे
 3. वाटेल त्या वाटेने मोकाट धावणे
 4. तहानभूक विसरून रानात फिरणे

अध्यापन पध्दती: कथन, प्रश्नोत्तर, स्पष्टीकरण, प्रायोगिक
अध्यापन सूत्र: ज्ञाताहून-अज्ञाताकडे,  सोप्यातून कठिणाकडे
आशयातील नवे शब्द: ओढाळ, रान, घेरू, न्यारे, रानोमाळ
वाक्प्रचार: कानामध्ये वारे शिरणे, फेर धरणे
संबोध: कळप, तहान, फेर, वाट, भान
नादयुक्त शब्द: मोकाट-मोकाट, अफाट-अफाट
व्याकरण:
शब्दांच्या जाती, लिंग, वचन, काळाची ओळख
मूल्ये:
संवेदनशीलता
गाभाघटक:
पर्यावरण संरक्षण, वैज्ञानिक मनोभावाची रूजवणूक

प्रस्तावना:

 1. तुम्ही जत्रेत कोणाबरोबर जाता?
 2. जत्रेत कोणकोणती मजा करता?
 3. जत्रेत हरवल्यानंतर काय अवस्था होते?

(शिक्षक वरिल प्रश्नांसंदर्भात वेगवेगळी उदाहरणे देऊन विवेचन करतात)

हेतूकथन :  तर आज आपण रानाता वाट चुकलेल्या एका वासराविषयी अधिक माहिती ”वासरू” या कवितेतून पाहू या.

(शिक्षक पाठयांशाची नोंद फलकावर करतात. कवी अनिल हयांच्याविषयी व त्यांच्या साहित्य लेखनाविषयी थोडक्यात माहिती देऊन कवितेचे सुस्वर भावपूर्ण गायन करतात. तद्नंतर कवितेचे ताला-सुरात गद्यवाचन करतात. विद्यार्थ्यांना मूकवाचन करण्यास सांगतात व हेतूप्रश्न विचारतात व त्याची उत्तरे स्वीकारतात.

ओढाळ वासरू रानी आले फिरू। कळपाचा घेरु सोडूनिया।
कानामध्ये वारे भरूनिया न्यारे। फेर धरी फिरे रानोमाळ।
मोकाट मोकाट अफाट अफाट। वाटेल ती वाट धावू लागे।
विसरून भान भूक नि तहान। पायाखाली रान घाली।

हेतूप्रश्न :

 1. ओढाळ वासरू कुठे फिरत होते?
 2. वासरू भूक नि तहान का विसरले होते?

(हेतूप्रश्नांची उत्तरे स्वीकारल्यावर शिक्षक कवितेचे एकेक कडवे वाचतात. संदर्भानुसार स्पष्टीकरण करतात. नवीन शब्द व संबोधांची विविध उदाहरणाद्वारे ओळख करून देतात. प्रश्न विचारतात. कडव्यागणिक येणारा व्याकरणाचा भाग स्पष्ट करतात. आवश्यक तिथे शैक्षणिक साहित्याचा वापर करतात. विद्यार्थ्यांचा शाब्दिक व कृतियुक्त सहभाग घेतात. फलकाचे योग्य नियोजन करून फलकलेखन करतात.)

उद्दिष्टे

ज्ञान :

 1. विद्यार्थी तहानभूक विसरून मोकाट फिरणार्‍या वासराबद्दल माहिती सांगतो.
 2. विद्यार्थी नवीन शब्द व संबोधाबद्दल माहिती सांगतो.

आकलन :

 1. विद्यार्थी तहानभूक विसरून मोकाट फिरणार्‍या वासराचे वर्णन करतो.
 2. विद्यार्थी कळपातील इतर वासरू व कळप सोडून सैरावैरा धावणाया वासराचे वर्णन करतो.

 उपयोजन :

 1. विद्यार्थी नवीन शब्द व संबोधांचा अर्थ स्वत:च्या शब्दात सांगतो.
 2. विद्यार्थी मोकाट फिरणाऱ्या वासराचे वर्णन स्वत:च्या शब्दात करतो.
 3. विद्यार्थी कवितेचे सुस्वर गायन करतो.

अभिरूची :

 1. विद्यार्थी वाट चुकलेल्यांविषयी अधिक माहिती मिळवितो.
 2. विद्यार्थी रान व रानातील इतर घडामोडींविषयी अधिक माहिती मिळवितो.

अभिवृत्ती :

 1. विद्यार्थी वाट चुकलेल्यांना मदत करतो.
 2. विद्यार्थी जीवनात योग्य वाट धरतो.

विषय प्रतिपादन : (पहिले कडवे)

ओढाळ वासरू रानी आले फिरू। कळपाचा घेरु सोडूनिया।

शिक्षक – (चित्र दाखवून) हया चित्राचे वर्णन कोण करेल?

विद्यार्थी- हया चित्रात रानाचे वर्णन केलेले आहे. रानातील झाडे, वेली, रानात फिरणारे इतर पशू-पक्षी तसेच गाई-वासरांचे कळप व गुराखी इत्यादिंचे वर्णन या चित्रात केलेले आहे.

शिक्षक – वासरासाठी कोणता शब्द आलेला आहे?

विद्यार्थी – ओढाळ वासरू

(शिक्षक ‘ओढाळ’ हा शब्द विविध उदाहरणाद्वारे स्पष्ट करून फलकावर लिहितात.)
(तसेच ‘ओढाळ वासरू’ हया शब्दाद्वारे नाम व विशेषण स्पष्ट करतात व इतर उदाहरणे देतात.)
(”वासरू” हा शब्द स्पष्ट करण्यासाठी शिक्षक पुढील उदाहरणे देतात. सिंहाचा बछडा, आईचं मूल, मेंढिचं कोकरू वगैरे)

शिक्षक – हे वासरू कुठे फिरत होतं?

विद्यार्थी- रानात

(शिक्षक ‘रान’ हा शब्द स्पष्ट करतात. तसेच हया शब्दासाठी समानार्थी शब्द विचारतात व फलक-लेखन करतात.)
(शिक्षक पुढील उदाहरणाद्वारे ‘कळप’ हा शब्द समजावून देतात – माणसांचा जमाव, फुलांचा गुच्छ, किल्ल्यांचा जुडगा, पक्ष्यांचा थवा इ.)

तसेच घेरु, सोडूनिया हे शब्द स्पष्ट करतात.

शिक्षक – वासरू कोणाला सोडून रानात एकटेच फिरायला गेले?

विद्यार्थी-  इतर वासरू, गाय आणि कळप

 दुसरे कडवे

कानामध्ये वारे भरूनिया न्यारे। फेर धरी फिरे रानोमाळ।

(शिक्षक ‘कानामध्ये वारे शिरणे’ हा वाक्प्रचार विविध वाक्याद्वारे स्पष्ट करतात. तसेच ”न्यारे” हा शब्द स्पष्ट करण्यासाठी विविध उदाहरणे देतात. ‘फेर धरणे’ हया वाक्प्रचाराच्या स्पष्टीकरणासाठी विद्यार्थ्यांकडून प्रत्यक्ष फेर धरून नाचून घेतात व विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा निर्माण करतात.

शिक्षक    -    वासरू रानात कसे फिरू लागले?

विद्यार्थी-  फेर धरून

तिसरे कडवे

मोकाट मोकाट अफाट अफाट। वाटेल ती वाट धावू लागे।

शिक्षक ‘मोकाट-मोकाट’ सारखे नादयुक्त शब्द विविध उदाहरणाद्वारे स्पष्ट करतात.

शिक्षक - वासरू रानात कसे फिरू लागले?

विद्यार्थी - मोकाट-मोकाट

शिक्षक - ‘प्रचंड’ या शब्दासाठी समानार्थी कोणता शब्द आलेला आहे?

विद्यार्थी - अफाट

चौथे कडवे (चित्र दाखवून)

विसरून भान भूक नि तहान। पायाखाली रान घाली।

शिक्षक - या चित्राचे वर्णन कोण करेल?

विद्यार्थी – या चित्रात रान दाखवलेले आहे. तसेच या रानात भरकटलेले वासरू व त्याची दयनीय स्थिती दाखवलेली आहे.

शिक्षक ‘भान’ हा शब्द स्पष्ट करतात. तसेच भूक-तहान, रान हे संबोध वेगवेगळया उदाहरणाद्वारे समजावून देतात.

(तसेच कवितेचा पुढील भाग थोडक्यात सांगतात)
शिक्षक पाठयांश व सद्यस्थितीची मूल्ये व गाभाघटकाशी सांगड घालतात)

संकलन

शिक्षक पुढील प्रश्नाद्वारे संकलन करतात.

प्रश्न -  यमक साधणाऱ्या शब्दांच्या जोडया लावा.

वासरू, न्यारे, भान
रान, फिरू, सारे

उपयोजन : शिक्षक विद्यार्थ्यांकडून कवितेतील शिकविलेल्या कडव्यांचे सुस्वर गायन करून घेतात व योग्य मार्गदर्शन करतात.

स्वाध्याय : ‘जत्रेत हरवलेला मूलगा’ या विषयावर दहा ओळी लिहून आणा.

फलक – लेखन

ओढाळ कानामध्ये वारे शिरणे ओढाळ वासरू
रान फेर धरणे वासरू
कळप सोडूनिया
घेरु मोकाट-मोकाट
न्यारे अफाट-अफाट
भान भूक तहान

उपसंहार :

साहित्याचा संबंध येतो तो जो कलावंताने घेतलेल्या अनुभवाशी. अशा अनुभवांना विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्याचे कार्य अध्यापनाद्वारे घडत असते. साहित्याकृतीमध्ये माणसाच्या भाव-भावनांना, विचारांना, जीवनानुभवांना प्राधान्य असते. त्यातील उत्कटता जपणे व विद्यार्थ्यांना त्याचा प्रत्यय देणे हे साहित्य अध्यापन पध्दतीच्या यशाचे गमक होय. साहित्याच्या अध्यापनाद्वारे जीवनासाठी उपयुक्त असणारी कौशल्ये विकसित करुन त्यातील अनूभवातून होणाऱ्या जीवनदर्शनाद्वारे विद्यार्थी जीवन सुसंस्कृत करणे हे महत्वपूर्ण कार्य शिक्षकांद्वारे करावे लागते.

Click here to Download this article as PDF

4 thoughts on “आशययुक्त अध्यापन

 1. kishor vadnal on

  thanks ! sarva files PDF kelyabadal. Files download karun ghetle aahet. THANK U SIR

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may use these HTML tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <strike> <strong>